Ad will apear here
Next
उडत्या तबकड्या (उत्तरार्ध)


उडत्या तबकड्यांचे गूढ अद्याप उलगडलेले नाही, हे खरे असले, तरी त्यांच्या नोंदी मात्र बऱ्याच झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा उडत्या तबकड्या दिसल्याचे अनुभव लोकांनी लिहून ठेवले आहेत. त्यावरून त्यांचा काही अभ्यास, वर्गीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ सदरात आज उडत्या तबकड्यांच्या लेखाचा उत्तरार्ध...
..............
अत्यंत वेगाने उडणारी निरनिराळ्या आकारांची याने काही वेळा दिसतात, ज्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही, याची अमेरिकन लष्करी समित्यांना खात्री झाली होती. प्राधान्याने त्यांचा अभ्यास व्हावा, असेही त्यातल्या अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु ती शिफारस मान्य झाली नाही आणि ‘यूएफओ’ची फाइल बंद करण्यात आली. काही सरकारी गुप्त यंत्रणा मात्र गाजावाजा न करता त्याचा पाठपुरावा करत राहिल्या. अन्य देशांतही ‘तबकड्यां’च्या नोंदी आणि संशोधन सुरू झाले. इंग्लंडमध्ये जून १९५१मध्ये ‘फ्लाइंग सॉसर वर्किंग पार्टी’ने आपला अंतिम अहवाल तयार केला; पण पुढील पन्नास वर्षे तो गुप्त ठेवण्यात आला. जोपर्यंत जमिनीवर उतरलेले, कोसळलेले यान आणि परग्रहावरील ‘माणसे’ प्रत्यक्ष समोर दिसत नाहीत, तोपर्यंत त्यांचे संशोधन चालू ठेवण्याची आवश्यकता नाही, असे निष्कर्ष सरकारी पातळीवर काढण्यात आले. 

सन १९८०मध्ये सुमारे १८०० हौशी खगोलशास्त्रज्ञांचे सर्वेक्षण झाले. ‘ज्याचे स्पष्टीकरण देता आले नाही, अशी अज्ञात याने तुम्ही कधी प्रत्यक्ष पाहिली का?’ या प्रश्नाला त्यातल्या २४ टक्के जणांनी ‘होय’ असे ठाम उत्तर दिले. सन २०११पूर्वी वर्षाला सुमारे ३०० तबकड्या दिसल्याची नोंद होत होती. ती पुढील तीन वर्षांत ५००वर गेली. ‘या विश्वात आपण एकटेच (मानव!) नाही, हे स्पष्ट झालेले आहे!’ असे हौशी शास्त्रज्ञांचे मत होते.

‘आम्ही उडत्या तबकड्या पाहिल्या,’ अशा अनेक अहवालांवरून त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण करण्यात आले, ते असे -

- रडारवरून अज्ञात हवाई याने काही वेळा अनेक ठिकाणांहून एकाच वेळी दिसणे. वैमानिक लष्करी तळ आणि टॉवर्स यांची ती निरीक्षणे होती.

- फोटो, चलत् चित्रीकरण आणि व्हिडिओ यांचे पुरावे.

- तबकड्या जमिनीवर उतरल्याच्या खाणाखुणा (ठसे), जळलेली किंवा विखुरलेली माती, विद्युतचुंबकीय परिणाम, किरणोत्सर्गाची वाढती पातळी, काही धातूंचे अवशेष, करपलेले गवत.

- प्राणी, आणि माणसांवर शारीरिक परिणाम उदा. तात्पुरता अर्धांगवायूचा झटका, कातडी जळणे किंवा पुरळ, दृष्टीवर परिणाम, किरणोत्सर्गासारखे अपाय.

- गुरेढोरे मृत्युमुखी पडणे, छिन्नविच्छिन्न होणे.

- वनस्पतींवर परिणाम - वाढ खुंटणे किंवा भरपूर वाढणे. बिया रुजण्यात अडचणी.

- विजेवर चालणारी यंत्रे आणि विमानांच्या यंत्रणेत बिघाड - ती तात्पुरती बंद पडणे.

‘यूएफओ’चे आकार आणि प्रकारांवरूनही विभाग पाडण्यात आले.

- आवाजविरहित, बशीसारखी, घुमटाप्रमाणे वरचा भाग असलेली हवाई जहाजे.

- मोठी, त्रिकोणी, रात्रीच्या वेळी दिसणारी याने.

- सिगारचा आकार आणि त्यात प्रकाशाने उजळणाऱ्या खिडक्या.

- इंग्रजी व्ही (V) या अक्षरासारखा उलटसुलट आकार, समद्विभुज त्रिकोणी, चंद्रकोर, चकाकते गोलक, बूमरँग इत्यादी



त्यांचा वेग आणि पृथ्वीच्या किती जवळून ‘तबकड्या’ उडत गेल्या, यालाही महत्त्व होते. वेळोवेळी दिसलेल्या तबकड्या, परग्रहावरील ‘मानवा’ने दिलेल्या भेटी आणि मनुष्य/प्राण्यांची यानांकडून अपहरणे यांच्या कालानुक्रमे नोंदी झालेल्या आहेत. ख्रिस्तपूर्व १४५० ते आजतागायत असा त्यांचा क्रम आहे. त्यातील काही निवडक उदाहरणे आपण पाहू.

- सन ख्रिस्तपूर्व १४५० : स्थळ जुने इजिप्त - तेजस्वी अग्निगोळ्यासारख्या तबकड्या आकाशात तरंगताना दिसल्या. (भूर्जपत्रावरील नोंद) 

- ख्रि.पू. २१८ : रोमन रिपब्लिक - ‘मृतात्म्यां’चे हवाई जहाज (लेखी वर्णन)

- ख्रि.पू. ७६ : रोमन रिपब्लिक - इतिहासकार प्लिनीच्या वर्णनाप्रमाणे एका ताऱ्यामधून एक ठिणगी निघाली आणि पृथ्वीजवळ येताना चंद्राएवढी झाली. पुन्हा ती मागे जात प्रकाशरूप बनली.

- सन ६६ : जेरुसलेम - रोमन सैन्याला आकाशात रथ आणि सशस्त्र देवदूत दिसले.

- सन १५९१ : न्यूरेंबर्ग (रोमन राज्य) - तिथल्या रहिवाशांना हवाई युद्ध दिसले. नंतर एक मोठी त्रिकोणी काळी वस्तू दिसू लागली. शहराबाहेर प्रचंड स्फोटाचा आवाज आला. दर्शकांना शेकडो गोळे, दंडगोल आणि चित्रविचित्र आकाराच्या वस्तू आकाशात वेड्यावाकड्या फिरताना दिसल्या.

- सन १५९५ : टार्गोविस्टे, वॉलेशिया - शहराच्या वर धूमकेतूसारखी चमकती गोष्ट एका जागी दोन तास स्थिर अशी दिसली. नंतर ती अदृश्य झाली.

सन १८०१ : पूर्व यॉर्कशायर (यूके) - आकाशात अचानक तेजस्वी चंद्रासारखा गोळा दिसला. त्याच्या मधोमध एक काळी, दंडुक्यासारखी रेघ होती. काही काळ त्यातून निळा प्रकाश जमिनीवर पसरला. नंतर त्याचे सात प्रकाशमान गोळ्यांमध्ये तुकडे होऊन ते नाहीसे झाले.

- सन १८०३ : जपानचा पूर्व किनारा - स्थानिक कोळ्यांना पाण्यात जवळच एक जहाज तरंगताना दिसले. त्याचा तपास करताना अचानक त्यावर एक सुंदर स्त्री दिसली. तिचे केस लालसर पांढरे होते आणि कपडे अगदी चमत्कारिक. न कळणाऱ्या भाषेत ती लोकांशी बोलली. आधुनिक अभ्यासक त्या घटनेचे ‘परग्रहावरील व्यक्तीची जवळून घडलेली भेट’ असे वर्णन करतात. (Close Encounter of the Third Kind). 

- सन १८९६-९७ : अमेरिका - दोन वर्षांत उडत्या तबकड्या पाहिल्याचे अनेक अहवाल. प्राण्यांच्या (माणसांच्या) अपहरणाचे प्रयत्नही झाले.

- सन १८९७ : टेक्सास, अमेरिका - एक तबकडी कोसळली आणि त्याच्या ‘अन्यग्रहीय’ वैमानिकाचे दफन करण्यात आले. स्थानिक वार्ताहाराने दलास आणि फोर्ट वर्ड येथील वृत्तपत्रांकडे ती बातमी पाठवली.

- सन १९८० : सफोक, इंग्लंड - खूप कमी उंचीवरून उडणारे एक अज्ञात यान.

- २९ जानेवारी १९८० : टेक्सास, अमेरिका - एक मोठे, हिऱ्याच्या आकाराचे यान, ज्वाळा आणि उष्णता बाहेर सोडत वेगाने गेले. निर्मनुष्य जंगलातील रस्त्यावरून जाणाऱ्या तीन जणांना त्यामुळे जखमा झाल्या. किरणोत्सर्गाची विषबाधा झाल्यामुळे त्यांना उपचार घ्यावे लागले. त्यांनी सरकारवर दावा लावला.

- सन १९८३ : इंडियाना, अमेरिका - बास्केटबॉलच्या आकाराचे शेकडो प्रकाशगोलक दिसले. त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या खुणा मागे ठेवल्या.

- सन २४ ऑगस्ट १९९० : रोस्टॉक, पूर्व जर्मनी - रात्री साडेआठला असंख्य लोकांनी आकाशात सुमारे ३० मिनिटे सात तेजस्वी गोलक पाहिले. त्यांचा इंग्रजी ‘वाय’ (Y) अक्षरासारखा आकार होता. त्यांची छायाचित्रे काढलेली आहेत.

- १६ नोव्हेंबर १९९४ - रुवा. झिंबाब्वे - ६२ मुलांना जमिनीवर उतरलेले एक गोल यान दिसले. बाजूलाच एक लहान ‘माणूस’ उभा होता.

- ऑगस्ट २००४ ते ऑक्टोबर २००६ : इलिनॉइस, अमेरिका - एकूण पाच मोठ्या ‘तबकड्या’ चार वेळा त्या कालावधीत दिसल्या.

- २९ ऑक्टोबर २००७ : कोलकाता, भारत - पहाटे साडेतीननंतर पूर्व क्षितिजावर, ३० अंशांवर एक वेगाने जाणारे यान दिसले. त्याचा आकार बदलत गेला. प्रथम गोल, नंतर त्रिकोणी आणि मग सरळ रेषा. त्यातून प्रखर प्रकाश बाहेर पडत होता. यानाभोवती वलय दिसत होते. शेकडो चकित झालेल्या लोकांनी त्याचे ‘दर्शन’ घेतले. त्याचे चलत् चित्रीकरण दूरदर्शनवर दाखवण्यात आले.

- तीन ऑक्टोबर २०१४ : कोलोराडो, अमेरिका - शहराच्या वर आकाशात ‘तबकड्या’ दिसल्याचे अनेक अहवाल पोलिसांकडे आले. १५ मिनिटे ती अज्ञात वाहने आकाशात एका जागी स्थिर राहिली. नंतर प्रकाशझोत टाकत ती पर्वतांच्या दिशेने निघून गेली.

- २८ नोव्हेंबर २०१५ : गोरखपूर, भारत - तिथल्या ‘पाद्री बाजारा’च्या वर आकाशात बशीच्या आकाराची एक भली मोठी तबकडी घिरट्या घालत होती.

अनेक देशांमधल्या अशा शेकडो घटना आहेत. ज्यांना कुतूहल असेल त्यांना ‘गुगल’वरून दिनांकासह तपशीलवार नोंदी मिळतील.



उडत्या तबकड्यांनी अद्याप पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचे मोठे नुकसान किंवा हल्ले केलेले नाहीत. अपवाद, फक्त काही शारीरिक आणि मानसिक परिणाम किंवा विद्युत/चुंबकीय यंत्रणा बंद पडणे. आपल्यापेक्षा प्रगत सृष्टी विश्वाच्या अफाट पसाऱ्यात कुठे तरी असेल, या गोष्टीला शास्त्रज्ञांकडून अद्याप मान्यता नाही. समजा असेलच, तर तिथल्या विज्ञानाचे नियम आपल्याला ठाऊक नाहीत; मात्र त्यावर डोळसपणे संशोधन करत राहणे आवश्यक आहे आणि उपलब्ध माहिती/पुराव्यांचा सूक्ष्म अभ्यास झाला पाहिजे. २१व्या शतकात त्या विषयावर अधिक प्रकाश पडू शकेल, असे आपण तूर्तास मानू या.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZRRBW
Similar Posts
उडत्या तबकड्या (पूर्वार्ध) विज्ञानाने अनेक विषयांत आश्चर्यकारक प्रगती केली असली, तरी विश्वाची अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली नाहीत. ‘बिग बँग थिअरी’ (शून्यातून सृष्टीची निर्मिती), कृष्णमेघ, आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धांत, यांचा अभ्यास शास्त्रज्ञ अद्यापही करत आहेत. त्याचप्रमाणे, अद्याप न उलगडलेले एक गूढ म्हणजे ‘उडत्या तबकड्या!’ ‘किमया’
फेसबुकची मोहनिद्रा ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे. चार फेब्रुवारी हा फेसबुकचा स्थापना दिवस. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘फेसबुकच्या मोहनिद्रे’बद्दल
पदार्थविज्ञानाची प्रगत शाखा - नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी हा नैसर्गिकदृष्ट्या प्राणिजीवनाइतका जुना विषय आहे. एक शास्त्र म्हणून इतक्या सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास मात्र १९व्या शतकात सुरू झाला. आज तर हे तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे आणि भविष्यात त्यातून अनेक आश्चर्यकारक आविष्कार घडणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या किमयेबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language